कोथळ्यात फुटबॉलला नवी दिशा; नव्या गोलपोस्टचे लोकार्पण

 कोथळे एफसीच्या थरारक सामन्यात कोथळे ‘ब’ संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय

कोथळे ( प्रतिनिधी ) :  कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेच्या मैदानावर फुटबॉलच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली. नव्याने उभारण्यात आलेल्या फुटबॉल गोलपोस्टचे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील युवा खेळाडूंना सरावासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.यावेळी व्हीएमपीकेचे अध्यक्ष विजय जगताप आणि सोमनाथ वेल्डिंग वर्क्सचे मालक सोमनाथ राऊत यांच्या उपस्थितीत गोलपोस्टचे लोकार्पण करण्यात आले. व्हीएमपीकेचे प्राचार्य प्रशांत कदम तसेच सासवड एफसीचे व्यवस्थापक इम्रान शेख यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

           नवीन गोलपोस्टच्या निर्मितीसाठी सह्याद्री स्टीलचे मालक निखिल घारे, युनिक इंडस्ट्रीजचे मालक संदेश जगताप आणि सोमनाथ वेल्डिंग वर्क्सचे मालक सोमनाथ राऊत यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच इंडियाना ग्रीटिंग्सचे व्यवस्थापक प्रवीण भोसले यांनी गोलनेटसाठी, कऱ्हामाई इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विक्रमसिंह भोईटे यांनी फुटबॉल जर्सी व शॉर्ट्ससाठी, तर कल्पतरू कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल कुदळे यांनी फुटबॉलसाठी सहकार्य केले.स्थानिक खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, फुटबॉलच्या विकासाला चालना देणे आणि नव्या पिढीला मैदानी खेळांकडे आकर्षित करणे, या उद्देशाने उभारण्यात आलेली ही सुविधा कोथळ्यातील फुटबॉल संस्कृतीला बळ देणारी ठरणार आहे.




कोथळे ‘अ’ विरुद्ध ‘ब’ सामना रंगला

गोलपोस्टच्या लोकार्पणानंतर कोथळे फुटबॉल क्लबतर्फे कोथळे ‘अ’ आणि कोथळे ‘ब’ संघांमध्ये आंतरक्लब सामना खेळवण्यात आला. नव्या गोलपोस्टवर झालेल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक आणि दमदार खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना शेवटपर्यंत रंगतदार ठरला. कोथळे ‘अ’कडून तपेंद्रने ६व्या, १८व्या आणि ३३व्या मिनिटाला गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र कोथळे ‘ब’ संघानेही हार न मानता जोरदार पुनरागमन केले. विक्रमसिंहने २८व्या, ओंकारने ३८व्या आणि वैभवने ५३व्या मिनिटाला गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला.दरम्यान, कोथळे ‘अ’चा गोलरक्षक कृष्णाने उत्कृष्ट गोलरक्षण करत प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक आक्रमणांना यशस्वीपणे रोखले. त्यामुळे सामन्यातील चुरस अखेरपर्यंत कायम राहिली.निर्धारित वेळ संपल्यानंतर दोन्ही संघ ३-३ अशा बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे निश्चित करण्यात आला. यामध्ये कोथळे ‘ब’ संघाने ३-२ असा विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.या सामन्यात तपेंद्रने कोथळे ‘अ’कडून ६, १८ आणि ३३व्या मिनिटाला गोल केले. तर कोथळे ‘ब’कडून विक्रमसिंहने २८व्या, ओंकारने ३८व्या आणि वैभवने ५३व्या मिनिटाला गोल नोंदवला.

            नव्या गोलपोस्टचे लोकार्पण आणि त्यानंतर झालेल्या चुरशीच्या सामन्यामुळे कोथळ्यातील फुटबॉल खेळाडू, फुटबॉलप्रेमी आणि स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नव्या सुविधेमुळे परिसरातील युवा खेळाडूंना अधिक चांगल्या पद्धतीने सराव करण्याची संधी मिळून कोथळ्यातील फुटबॉल संस्कृतीला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





Post a Comment

0 Comments